माझी जीवनगाथा -प्रबोधनकार ठाकरे
महाराच्या सावलीचा विटाळ:
असेन त्यावेळी मी आठ-नऊ वर्षांचा. एका शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला शाळा सुटली नि मुलांच्या घोळक्यात मी घरी परत येत होतो. इतक्यात कामानिमित्त लांबडा झाडू घेऊन रस्त्याने जाणाऱ्या अन्या महाराची सावली माझ्यावर पडली. हे त्या मुलांनी पाहताच, "अरे, अरे ठाकऱ्यावर महाराची सावली पडली, त्याला विटाळ झाला. त्याला कुणी शिवू नका, दूर व्हा, पळा." असा सारखा ओरडा केला. अन्या महार तर केव्हाच निघून गेला, पण त्याच्या सावलीचे भूत मला चिकटले. मी एकटाच एका बाजूला आणि माझ्या मागे दहा-बारा शाळकरी पोरे 'याला शिवू नका, विटाळ होईल' ओरडत चाललेली. ही विटाळाची मिरवणूक आमच्या अंगणात आली. विरुपाक्षाच्या विहिरीवर बय पाणी भरीत होती. धर्ममार्तण्डाच्या अवसानात नि धर्माऱ्हासांच्या तिरमिरीने मुलांनी तिला माझ्या विटाळाची कहाणी सांगून, "त्याला आंघोळ घाला, लवकर घाला, शिवू नका" असा एकच कोलाहल केला. काही तरी भयंकर गुन्हा केला आहे, अशा भेदरलेल्या मनःस्थितीत पाटीदप्तर घेऊन मी उभा. बय प्रथम मोठ्याने हसली नि म्हणाली, "महाराची सावली पडली म्हणून हा विटाळला. ब्राह्मण हा महारापेक्षा पवित्र फार मोठा सोवळा. खरं ना रे? (होय होय, मुलांचा जबाब) मग आता त्याच्यावर ब्राह्मणाची सावली पाडली का महाराच्या सावलीचे पाप गेले, त्यासाठी आंघोळ रे कशाला?” चटकन तिने अभ्यंकर नावाच्या मुलाचे मनगट धरले नि त्याला पुढे ओढून माझ्यावर सावली पाडली. “झालं का, महाराची सावली पडली तर माणूस महार होतो. आता ब्राह्मणाची सावली पडली म्हणून दादा आता ब्राह्मण झाला. कसला रे हा सावलासावलीचा पाणचटपणा? खातेऱ्यात लोळणाऱ्या गाढवाला खुशाल शिवता. तेव्हा नाही रे विटाळ होत? माणसाच्या सावलीचा विटाळ मानणं महापाप आहे. समजलात? चला जा घरोघर. आंघोळ नाही न् बिंघोळ नाही. आचरटपणा सगळा. हेच शिकता वाटतं शाळेत जाऊन?" मला तिने तसाच घरात नेला आणि असल्या मूर्खपणाच्या कल्पना टाकून देण्याची खरमरीत तंबी दिली. यानंतर अस्पृश्यांच्या सावलीचे भूत मी कधीच जुमानले नाही. (पृष्ठ क्र. ७६)